जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा शुक्रवारपासून
कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषद कोल्हापूर कडील दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा होणार असून स्पर्धेची सुरुवात महिला क्रिकेट खेळापासून होणार आहे. या स्पर्धा दिनांक 10 जानेवारी, 2025 रोजी मेरी वेदर ग्राउंड येथे सकाळी ठिक 10.00 वाजता सुरु होणार असून स्पर्धेचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन. एस यांच्या शुभ हस्ते होणार आहे. महिला क्रिकेट स्पर्धेसाठी तालुक्यातून 12 संघ व मुख्यालयातून 02 संघ असे एकूण 14 संघ सहभागी झाले आहेत.
यानंतर पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेस संपन्न होणार आहेत. जिल्हा परिषद कोल्हापूर कडील क्रीडा स्पर्धा सन 2014-15 पासून सुरु झाल्या असून सदर क्रीडा स्पर्धेमध्ये महिला व पुरुष यांचे सांघिक खेळ प्रकारात कबडडी, खो-खो, रिले, व्हॉली बॉल, बॅडमिंटन चा समावेश आहे व वैयक्तीक मध्ये कॅरम, बुध्दीबळ, सायकलींग, गोळा फेक, थाळी फेक, 100 मीटर, 200 व 400 मीटर धावणे, बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. तसेच दोन दिवस सांस्कृतीक कार्यक्रमही घेतले जातात त्यामध्ये कराओके, लाईव्ह सिगिंग, ग्रुप डान्स, सोलो डान्स, मिमिक्री यांचा समावेश असतो. क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरण होत असून त्यांच्या मधील कलागुणांना वाव मिळतो.