जिल्ह्यातील 55 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान

जिल्ह्यातील 55 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील अनुदानित 55 वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या 12 ऑगस्ट पासून विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियानाची अंमलबजावणी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली.

शासनाच्या विविध संस्था यामध्ये सारथी, बार्टी, आदिवासी विभाग टीआरटीआय, महाज्योती, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व अमृत या संस्थांमार्फत या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे अभियान सर्व विद्यार्थी, युवकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेऊन आवश्यक जनजागृती करून अभियान यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिले. 

महाराष्ट्र शासनामार्फत या संस्थांद्वारे राज्यातील विविध लक्षित गटांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. विविध प्रशिक्षणांसह दाखल्यांचे वितरण, शैक्षणिक मार्गदर्शन, विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, शिक्षणासाठी अर्थसाह्य योजना, शिष्यवृत्ती तसेच पुरस्कार वितरण केले जाते. 

या अनुषंगाने एकत्रित हे सर्व सात आठ विभाग प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अभियानाची अंमलबजावणी करून शासनाच्या योजना तसेच विविध लाभ विद्यार्थ्यांना थेट देणार आहेत. याबाबत येत्या 12 ऑगस्ट जागतिक युवक दिनानिमित्त अभियानाचा शुभारंभ करून जिल्ह्यातील वरिष्ठ 55 महाविद्यालयांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या संस्थांबद्दलची माहिती, योजनांचे लाभ, दाखल्यांचे वितरण तसेच अनुषंगिक प्रशिक्षणही दिले जाणार आहे.  

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या अभियानात महाविद्यालयांमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पथदर्शी प्रकल्पासह विविध योजनांची माहिती देणारा चॅटबॉट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तसेच आपले सरकार नोंदणी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती द्या अशा सूचना केल्या. ऑनलाइन दाखले कशा पद्धतीने काढले जातात हे विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी प्रशिक्षित करून ते दाखले काढण्यासाठी प्रवृत्त करा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राबविण्यात येत असणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये याचा समावेश करून योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील असे नियोजन करा. 12 ऑगस्ट पूर्वी किमान आठ ते दहा दिवस चांगल्या पद्धतीने सर्व स्तरावर प्रसिद्धी होईल यासाठीही नियोजन करण्याचे त्यांनी निर्देशित केले. 

या बैठकीला सारथीच्या सहाव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अधीक्षक सचिन पाटील, आदिवासी विकास विभाग प्रतिनिधी दिलीप घुले, अमृत योजनेचे प्रथमेश कुलकर्णी, प्रशांत जोशी, सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण सुनीता नेर्लीकर यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी उपस्थित होते.