पावसाळी अधिवेशनात गोंधळ ; खा. संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई - आताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या काही दिवसांत विधानमंडळात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादामुळे दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकाराची राज्यभर तीव्र चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळजनक विधान केलं आहे. विधानमंडळाच्या परिसरात जे प्रकार घडले, ते महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेला काळीमा फासणारे आहेत. या अधोगतीला भाजपची गुन्हेगारांना पाठीशी घालणारी धोरणं कारणीभूत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले, "भाजप इतका खाली गेला आहे की उद्या जर दाऊद इब्राहिम आला आणि पक्षात यायचं म्हणाला, तरी ते त्याला प्रवेश देतील. ते म्हणतील तो इतके वर्ष भारतात नव्हता, त्याच्यावर काही गुन्हा नाही. मग छोटा शकील, टायगर मेमन यांच्यावरचे गुन्हेही मागे घेतले जातील. कारण त्यांना विरोधकांना संपवायचंय कायद्याच्या मार्गाने नाही, तर बळाचा वापर करून."
‘विधानभवनात आमदाराच्या हत्येचा कट’
संजय राऊत यांनी दावा केला की विधानभवनात एका आमदाराची हत्या करण्याचा कट होता. "मकोका कायद्यातील आरोपी, खून प्रकरणातले गुन्हेगार विधिमंडळाच्या दारात येऊन मारामारी करतात. हे सगळे कोणाचे आहेत? तुमच्याच आमदारांचे. त्यांच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत," असं राऊत म्हणाले.
‘भाजप गुन्हेगारांचं आश्रयस्थान’
"आज भाजप गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालं आहे. एखाद्याने गुन्हा केला, की भाजपमध्ये प्रवेश घ्या – मग आमदार, खासदार किंवा नगरसेवक व्हा, किंवा कमीत कमी संरक्षण तरी मिळवा. हीच या राज्याची स्थिती आहे. मग महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल कोणत्या गप्पा मारता?" असा सवाल त्यांनी केला.
मुंबईचा मुद्दा आणि अदानींवर टीका
राऊत यांनी भाजप सरकारवर मुंबईमधील मालमत्ता अदानी समूहाकडे देण्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली. "मुंबईचा सातबारा थेट गुजरातमधील उद्योजक गौतम अदानींच्या हातात दिला जातोय. गिरणी कामगारांना शहराबाहेर फेकलं जातंय – कर्जत, वांगणी, शेलूपर्यंत. मराठी माणसाला मुंबईत घर घेता येणार नाही अशी परिस्थिती केली आहे. मुंबई खरंच मराठी माणसाची राहिलीय का?" असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.
"लोढा हे तुमच्या पक्षाचे आहेत. त्यांनीही मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या आहेत," असा आरोप करत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.