वाढीव टप्प्याचा गुरूवारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी अरविंद पाटील - महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समिती च्या आंदोलनाचा ७० वा दिवस पार पडला. १२ जुलैला सभागृहात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा करून सुद्धा वाढीव टप्प्याचा जीआर अद्यापही निघालेला नाही. बऱ्याच कॅबिनेट बैठका झालेल्या आहेत. कृती समितीने आमरण उपोषण तसेच विविध धरणे आंदोलन करून अविरतपणे पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री लोकप्रतिनिधी यांना भेटून वारंवार याची जाणीव करून दिली आहे. या नेत्यांनीही सरकार दरबारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री संबंधित विभागाचे अधिकारी यांना फोन करून शिक्षकांच्या भावना कळविल्या आहेत. तसेच आपल्या वाढीव टप्प्याचा जीआर निघणारच असे वेळोवेळी या नेत्यांनी कृती समितीला सांगितलेले आहे. त्यानुसार गुरूवारच्या कॅबिनेटकडे राज्यातील ६७ हजार शिक्षकांचे डोळे लागलेले आहेत.
दरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची कृती समितीच्या शिष्टमंडळाने गारगोटी येथे भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी कृती समितीला वारंवार आश्वासन दिलेले आहे. आजही त्यांनी सांगितले की येणाऱ्या बैठकीत आपला वाढीव टप्प्याचा जीआर निघणारच. त्यानुसार उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय होऊन शासन निर्णय निघतोय का हे पहावे लागेल. यावेळी शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे, शिवाजी कुरणे, शशिकांत खडके, सुभाष खामकर, अरविंद पाटील, भानुदास गाडे अनिल ल्हायकर, वैजनाथ चाटे, राजू भोरे,जालंधर कांबळे सावंता माळी महिंद्र वाघमारे एस आर साळूखे मुक्ता मोटे गौतमी पाटील, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे आदी उपस्थित होते.
"मतदानावर आणि निवडणुक कामावर बहिष्कार टाकणार"
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा आदेश व विविध मागण्यांसाठी सव्वादोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा आदेश काढण्यात येईल, असे वारंवार सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 15 च्या वर मंत्रिमंडळ बैठका झाल्या आहेत. यातील कोणत्याही बैठकीत निर्णय घेता आला असता. परंतु सरकार चालढकल करत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौऱ्यात आल्यावर पुढील मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव टप्प्याचा आदेश काढणारच, असे आश्वासन दिले आहे. आज परत त्यांच्याकडून असे आश्वासन आलेले आहे. जर आमचा शासन निर्णय निघाला नाही तर आगामी निवडणुकीच्या कामावर तसेच मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल.
- खंडेराव जगदाळे