डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वसमावेशक उच्च शिक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : देशातील अपंग, आर्थिक दृष्ट्या मागास आणि वंचित विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणाऱ्या उच्च शिक्षणाबाबतची रणनीती आणि ध्येयधोरणे ठरवण्यासाठी डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वास्तुकला विभागाच्यावतीने आयोजित ‘सर्वसमावेशक शिक्षण आणि अध्यापन पद्धती’ या विषयावर पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ‘इरास्मस+’ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पातर्गत आयोजित या कार्यशाळेला भारतातील चार विद्यापीठांंसहित स्पेन आणि लॅटेविया या देशातील विद्यापीठ प्रतिनिधींचा सहभाग होता.
२४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर भर देतानाच सर्वसमावेश आणि न्याय्य शिक्षणासाठी जागतिक दृष्टिकोनाला गती देण्यात आली. शिक्षण सर्वदूर पोहचवण्यासाठी विविध उपाययोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली. ‘इरास्मस+’ प्रकल्पातर्गत झालेल्या या कार्यशाळेमध्ये गुजरातमधील सार्वजनिक विद्यापीठ, चारुतर विद्या मंडळ विद्यापीठ, गणपत विद्यापीठ, डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर त्याचबरोबर स्पेनमधील यूनिव्हर्सिडाड पॉलिटेक्निका दे कार्टाजेना (UPCT), आणि लॅटव्हियामधील रिगाटेक्निस्का यूनिव्हर्सिटेट (RTU) या संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
२४ फेब्रुवारी रोजी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी स्वागतपर भाषणात सर्वसमावेश आणि न्याय्य शिक्षणाच्या आवश्यकतेवर भर दिला. सार्वजनिक विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. पर्सी इंजिनियर यांनी ‘इरास्मस’ प्रकल्प, त्याचे उद्देश याबाबत सादरीकरण केले. त्यानंतर उपस्थितांनी डी. वाय. पाटील ग्रुपच्या कोल्हापूर आणि तळसंदे येथील विविध महाविद्यालयांना भेटी दिल्या.
२५ रोजी सार्वजनिक विद्यापीठाच्या टीमने नवीन अभ्यासक्रम पद्धती आणि संरचनेवर चर्चा केली. अध्यापन-शिक्षण फ्रेमवर्क आणि डिजिटल पोर्टलबाबतच्या संकल्पना मांडल्या. यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक श्री. यजुर्वेंद्र महाजन यांचे सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण पद्धतींवर व्याख्यान झाले. सायंकाळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या उपस्थितीत सोशल नेटवर्किंग डिनर झाले. यावेळी ‘इरास्मस+’ साठी आपले नेहमीच पाठबळ राहिल अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली. यावेळी डी. वाय पाटील समूहातील कुलगुरू, प्राचार्य, रजिस्ट्रार यांची उपस्थिती होती.
तिसऱ्या दिवशी रिगाटेक्निस्का यूनिव्हर्सिटेटने प्रस्तावित अध्यापन-शिक्षण फ्रेमवर्क सादर करत त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रणनीतींवर चर्चा केली. यासाठी सर्व घटकापर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी डिजिटल पोर्टल, सॉफ्टवेअर व अन्य शिक्षण पद्धती यावर चर्चा झाली. त्यांनंतर उपस्थितांनी अवनी प्रकल्पाला भेट दिली.
चौथ्या दिवशी स्पेन विद्यापीठ प्रतिनिधींनी उद्योग जगताच्या गरजांशी सुसंगत अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला. व्यावसायिक संस्थांशी सहयोग, सरकारी धोरणे, प्रमाणपत्रे, इंटर्नशिप, करिअर, माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क यांच्या गरजेवर भर देण्यात आला.
अखेरच्या दिवशी स्पेन आणि लॅटव्हियामधील तज्ञांनी कार्यशाळेत विकसित केलेल्या रणनीतींवर भाष्य करत ज्ञानाच्या देवाण- घेवाणीवर भर दिला. याबाबतची उपयुक्त शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी वारवार मिटिंग घेण्यावर आश्वस्त केले.
या कार्यशाळेसाठी अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के, गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे सहकार्य लाभले. वास्तुकला विभाग प्रमुख प्रा. आय. एस. जाधव आणि इरास्मस+ टीमच्या प्रा. जी. ए. म्हेतर, डॉ. सनी मोहिते, प्रा.तिलोत्तमा पाडळे, डॉ. एम.ए. मिठारी, प्रा. टी. बी. पिंगळे यांनी कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी मेहनत घेतली.