महामार्ग पिलर वरचं उभा करा : रविवारी धरणे
पुणे बेंगलोर महामार्गांवर भराव न टाकता त्याऐवजी पिलरवर पूल उभारावा, अशी मागणी करत पूरग्रस्त समितीकडून रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महामार्गावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. याबाबतचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले. कोल्हापूर शहर आणि परिसरातून पाण्याचा निचरा होण्यास महामार्गावरील भरावा मुख्य अडथळा ठरणार आहे. यामुळे तो काढून टाकावा, अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.
महामार्गावरील भराव काढण्याऐवजी तो आणखी चढवून उंची वाढवली जाणार आहे . यामुळे महापुराची स्थिती अधिक गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे समितीने या निवेदनात म्हटले आहे. भराव टाकून रुंदीकरणाचे काम त्वरित थांबवावे, त्याऐवजी पिलर टाकून पूल उभारून रस्ता करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी रविवारी धरणेआंदोलन केले जाणार आहे.
यासंदर्भात नायब तहसीलदार नम्रता शिराणे-चौगुले यांना निवेदन देण्यात आले . महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन भरावाबाबत काय धोरण राबविणार आहेत,याचे स्पष्टीकरण द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला .