मेतकेत बाळूमामांच्या भंडारा महोत्सवास प्रारंभ : सोहळ्याचे ९३ वे वर्ष

हमीदवाडा प्रतिनिधी : सद्गुरू बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या मेतके (ता. कागल) येथील श्री बाळूमामा-हालसिद्धनाथ मंदिरामध्ये बाळूमामांच्या भंडारा महोत्सवास प्रारंभ झाला. यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे.
स्वतः सद्गुरू बाळूमामा यांनी १९३२ मध्ये या उत्सवाचा प्रारंभकेला. यंदा सोहळ्याचे ९३ वे वर्ष आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून लाखावर भाविक या भंडारा सोहळ्याच्या सांगता समारंभप्रसंगी उपस्थित राहतात. या सात दिवसांच्या महोत्सवाचा प्रारंभ वीणा
पूजनाने हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभाने झाला. यावेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, अध्यक्ष आर. डी. पाटील, सदस्य दयानंद पाटील, बळीराम मगर, देवाप्पा पुजारी यांसह भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते. सप्ताहामध्ये अनुक्रमे ह.भ.प. बळीराम तांबेकर,बाळासाहेब पाटील, उदय शास्त्री, नारायण एकल, एकनाथ गुरव, एस. डी. पन्हाळकर, आबासाहेब देसाई, पांडुरंग उपलाने, शशिकांत गुरव यांची प्रवचन व कीर्तन सेवा होणार आहे. सोमवारी जागर असून सायंकाळी साडेपाच वाजता विविध गावांचे वालंग व श्रींची पालखी सोहळा निघणार आहे. रात्री ढोल वादन, हेडाम खेळ व पहाटे ४ वाजता भगवान डोणे वाघापुरे हे भाकणूक करतील. मंगळवार, दि. ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता व शशिकांत गुरव यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित केला आहे.