गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील दूध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष रवींद्र पांडुरंग आपटे (वय ७१, रा. सन्मित्र हौसिंग सोसायटी) यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले.
त्यांच्यावर आज, बुधवारी दुपारी १२ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रायव्हेट हायस्कूलमधील शिक्षणानंतर कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून बीएस्सी अॅग्री आणि राहुरी कृषी विद्यापीठातून एमएस्सी अॅग्रीचे शिक्षण त्यांनी घेतले होते. पदव्युत्तर शिक्षणात सुवर्णपदक पटकावणाऱ्या रवींद्र आपटे यांना विदेशामध्ये नोकरीची मोठी संधी असतानाही त्यांनी आपल्या आजरा तालुक्यातील शेतीमध्ये लक्ष घातले. आजरा तालुक्यात पहिल्यांदा संकरित गायी आणल्या. १९८६पासून सलग ३५ वर्षे ते 'गोकुळ'चे संचालक आणि तीन वेळा अध्यक्ष होते. 'महानंद'चे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. गेली चार वर्षे ते कर्करोगाने आजारी होते.
आजरा तालुक्यातील जनता दूध संस्था, कोल्हापूर येथील ट्रान्सपोर्ट या संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. जिल्ह्यातील विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ देण्याची त्यांची भूमिका होती. त्यांच्या पश्चात महालक्ष्मी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका पद्मजा आपटे यांच्यासह दोन मुले, सून आणि भाऊ सुधीर आपटे असा त्यांचा परिवार आहे.