डोंबिवली एमआयडीसीतील आणखी एका कारखान्यात स्फोट ; नागरिकांकडून सरकारच्या ढिसाळ कारभारावर बोट
मुंबई (प्रतिनिधी) : जवळपास १५ दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीमधील एका कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या स्फोटात कारखान्यातील १३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवली एमआयडीसीतील आणखी एका कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटांमुळे कारखान्याला मोठी आग लागली आहे. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान या कंपनीत आग लागली होती. आता याच अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या इंडो अमाईन्स कंपनीत आग लागली आहे. कारखान्यात स्फोटांची मालिका चालू असून परिसरात घबराट पसरली आहे. या एमआयडीसी परिसरात एक शाळा देखील आहे. आग आणि स्फोटांची मालिका पाहून शाळेने सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवलं आहे.
या कारखान्यात मजूर होते का याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सकाळी कारखान्याच्या आसपास मजूर दिसले होते. त्यामुळे या स्फोटावेळी मजूर कारखान्यात असण्याची शक्यता आहे. धुरामुळे तसेच स्फोट होत असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही एक रासायनिक कंपनी आहे. या कंपनी परिसरातील उत्पादन प्रक्रिया बंद करून कामगारांना सुरक्षितेच्या दृष्टीने कंपनी बाहेर काढण्यात आलं आहे. इंडो अमाईन्स कंपनीत जीवितहानी झाली नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे. वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.
या कंपन्यांचे नियंत्रक अधिकारी या कंपन्यांची नियमित देखभाल, या कंपन्यांमधील त्रृटी काढून त्याचे अनुपालन करण्याचे आदेश देतात की नाही, असे प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित झाले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित कंपन्यांची पाहणी केली तर असे प्रकार घडणार नाहीत. त्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचे उद्योजक सांगतात.
अमुदान कंपनी स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. या कंपन्या अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात पुन्हा एकदा एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत आग लागल्याने कंपनी मालक पुन्हा नागरिक, शासन, चौकशी यंत्रणांकडून लक्ष्य होऊ लागले आहेत. एमआयडीसीतील या सततच्या आगीच्या दुर्घटनांमुळे परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. तसेच प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्नदेखील नागरिक उपस्थित करत आहेत.