दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी दिल्ली – आज सकाळी 9 च्या दरम्यान दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि ग्रेटर नोएडासह अनेक भागांमध्ये सुमारे 10 सेकंदांपर्यंत या धक्क्यांची तीव्रता जाणवली. कामाच्या ठिकाणी आणि घरी असलेल्या नागरिकांना या हादऱ्यांचा अनुभव आला असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जरपासून सुमारे 10 किमी उत्तरेला होता. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही, हे दिलासादायक आहे.

भूकंपाच्या धक्क्यांनंतर अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले, तर काहींनी घरामध्ये सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. काही ठिकाणी घरातील वस्तूंनी हलायला सुरुवात केली होती. सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचे वातावरण असल्यामुळे आणि त्यातच आलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, नागरिकांना शांत राहण्याचे आणि अधिकृत सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.