नाशिक : विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याची सोनार समाजाची मागणी

नाशिक : विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याची सोनार समाजाची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - नाशिकच्या 37 वर्षीय विवाहित महिला भक्ती गुजराती यांच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या तिघांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोनार एकता फौंडेशनने केली आहे. "भक्ती अथर्व गुजरातीला न्याय मिळावा. ही आत्महत्या होती की हत्या, याचा सखोल तपास होऊन दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे," अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांच्याकडे फौंडेशनने दिले आहे.

भक्ती ही सोनार समाजातील असून तिचा प्रेमविवाह गुजराती समाजातील अथर्व गुजरातीसोबत झाला होता. त्यांना एक अपत्यही आहे. परंतु, एवढ्या संपन्न कुटुंबात असूनही भक्तीवर सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे.

गंगापूर पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, भक्तीला सतत अपमानित केले जात होते, रोज दारू पिऊन मारहाण केली जात होती आणि खच्चीकरण होत होते. या अत्याचारांमुळे कंटाळून तिने 19 मे रोजी आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेनंतर तिचे पती अथर्व, सासू मधुरा आणि सासरे योगेश गुजराती गुजरातमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गंगापूर पोलिसांनी त्यांना गुजरात सीमेजवळ अटक केली. सध्या तिघांवर भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असून, ते गंगापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.

दरम्यान, ही आत्महत्या नसून खून असण्याची शक्यता असून, उच्चस्तरीय तपास करून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील सोनार समाजात तीव्र संताप पसरला आहे.

 यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष अनिल दादा पोतदार (हुपरीकर), उपाध्यक्ष अनिष पोतदार, सचिव नचिकेत भुर्के, सदस्य राजकुमार धर्माधिकारी, पंचाल सोनार बोर्डिंगचे सचिव प्रकाश कबुरे आणि कालिका ब्रिगेडचे अध्यक्ष राजू बारस्कर उपस्थित होते.