ना. चंद्रकांत पाटील यांनी दिल्या बीबीए - बीसीए प्रवेशासाठी पुन्हा एकदा सीईटी घेण्याच्या सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी तसेच प्राचार्य संघटना यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बीसीए - बीबीए च्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील अडचणींबाबत सकारात्मक चर्चा होऊन बीसीए - बीबीए प्रवेश पूर्ण होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २५ - २६ साठी पुन्हा सीईटी घेण्याच्या सूचना ना. चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या शैक्षणिक वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बीबीए - बीसीए साठीची प्रवेश परीक्षा न दिल्यामुळे सदर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. आता पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्याना बीसीए - बीबीए साठी प्रवेश घेणे सोयीचे होणार आहे.
बीसीए - बीबीए अभ्यासक्रमासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे संलग्नीकरण शुल्क व अनामत रक्कम कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल व त्यासाठी चेअरमन AICTE यांची संस्थाचालकांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेणार असल्याचेही ना. पाटील यांनी जाहिर केले.
या बैठकीसाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी चे उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, प्राचार्य डी. आर. मोरे, एड. धैर्यशील पाटील, प्राचार्य व्ही. एम. पाटील, उच्च शिक्षण सचिव वेणुगोपाल रेड्डी, संचालक शैलेंद्र देवळणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव यांच्यासह आदी उपस्थित होते.