पंढरपूरमध्ये भीषण दुर्घटना : चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू

पंढरपूर – आज सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना समोर आली असून, चंद्रभागा नदीत बुडून दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातील दोन महिला आणि एका अनोळखी महिलेचा समावेश आहे.
भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या सुनीता सपकाळ (वय ४३) आणि संगीता सपकाळे (वय ४०) या दोन महिला आणि त्यांच्यासोबत असलेली एक अनोळखी महिला चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघीही बुडाल्या. काही भाविकांच्या लक्षात येताच आरडाओरड सुरू झाली आणि बचाव प्रयत्नही झाले. मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने महिलांना वाचवता आलं नाही.
आपत्कालीन यंत्रणांचा अभाव?
घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या आपत्कालीन तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासनाने आपत्कालीन बोट व कर्मचारी तैनात केल्याचा दावा केला होता, पण प्रत्यक्षात अशी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नव्हती, असा आरोप भाविक व स्थानिक नागरिकांनी केला आहे. वेळीच मदत मिळाली असती, तर या महिला वाचू शकल्या असत्या, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
या दुःखद घटनेने पंढरपूरमध्ये शोककळा पसरली असून, भाविकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.