Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट; पावसाची दाट शक्यता

पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४०च्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असून उष्माघाताने काही जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या यलो अलर्टमुळे विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वादळी पावसाचा इशारा
कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, परभणी, बीड, सातारा, अमरावती, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट होऊन पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता हे कमी दाबाचं क्षेत्र निवळलं आहे. मात्र उत्तर विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्याने विदर्भात ढगाळ वातावरण राहाण्याचा अंदाज आहे.
राज्यातील 'या' भागात हलक्या सरींची शक्यता
दरम्यान, आठवड्यापूर्वी राज्यात नाशिक, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसाने पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता नांदेड, लातूर, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग या भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.