बिद्रीवर रात्रीच्या अंधारात धाडी टाकणारे आबिटकर शेतकऱ्यांकडे कुठल्या तोंडाने मते मागतात? - फत्तेसिंह भोसले

बिद्रीवर रात्रीच्या अंधारात धाडी टाकणारे आबिटकर शेतकऱ्यांकडे कुठल्या तोंडाने मते मागतात? -  फत्तेसिंह भोसले

राधानगरी प्रतिनिधी : उसाला राज्यात उच्चांकी दर देणाऱ्या बिद्री साखर कारखान्याचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडवण्यासाठी या साखर कारखान्यावर रात्रीच्या अंधारात शासनाच्या धाडी टाकणारे आमदार प्रकाश आबिटकर आता कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांकडे मते मागत आहेत? असा सवाल बिद्री साखर कारखान्याचे संचालक फत्तेसिंह भोसले-पाटील यांनी केला.

तर, ज्या बिद्री साखर कारखान्याच्या एका सामान्य कामगाराचे आपण पुत्र आहोत त्याच कारखान्याला राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग करून अडचणीत आणणे हे कामगार पुत्र असलेल्या आबिटकरांना शोभते का? असा सवाल याच साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे यांनी केला.

नरतवडे (ता.राधानगरी) येथे माजी आमदार के पी पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत हे दोघेही बोलत होते.

भोसले-पाटील म्हणाले,"निवडणूक बिद्री कारखान्याची असो की विधानसभेची,बिद्रीच्या सभासदांची मते ही निर्णायक असतातच हे माहीत असूनही बिद्री साखर कारखाना अडचणीत आणून शेतकऱ्यांची बिले थकवायची आणि त्यामुळे चेअरमन असलेल्या के पी पाटलांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा अशी कुटील राजनीति आबिटकर यांनी आखली होती,परंतु असे करताना आपण एका साखर कारखान्याचे व शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान करीत आहोत याची जाणीव त्यांना राहिली नाही. याच रागातून बिद्रीच्या सभासदांनी त्यांचा कारखान्याच्या निवडणुकीत पराभव केला असून आता हेच सभासद शेतकरी या निवडणुकीतही आबिटकरांना त्यांची जागा दाखवितील."

 भाटळे म्हणाले,"वडील बिद्री कारखान्यात कामगार असल्यामुळे एकेकाळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला याचा विसर पडलेले कामगारपुत्र आबिटकर यांनी सत्तेचा दुरुपयोग करीत बिद्रीच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणारे प्रकल्प अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. असली शेतकरी हितविरोधी भूमिका केवळ बिद्रीच्याच नव्हे तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना रुचलेली नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी असलेले मतदार विद्यमान आमदारांचा पराभव करणार हे निश्चित आहे."

ज्येष्ठ संचालक राजेंद्र दादा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार के पी पाटील,राजाराम पाटील,सुरेश चौगले, भिकाजी एकल, शामराव देसाई, रणजीत बागल,आर के मोरे, वसंतराव पाटील आदींची भाषणे झाली. राहुल देसाई,दीपक नवणे,एम एन पाटील,टी ए मगदूम, ॲड.ए एम पाटील, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.

*आबिटकारांच्या संवेदना बोथट,म्हणूनच त्यांची गद्दारी* 

माजी आमदार के पी पाटील म्हणाले,"आमदार प्रकाश आबिटकर हे संवेदनाहीन आहेत. ज्यांच्यामुळे आपण राजकारणात आलो,ज्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्याला आमदार केले,ज्या साखर कारखान्यामुळे आपले वडील कुटुंबाचा गाडा हाकू शकले,ज्या शेतकऱ्यांनी मतदान देऊन आपल्याला विधानसभेत पाठविले अशा सर्वांशीच प्रकाश आबिटकरांनी वेळोवेळी गद्दारी केली आहे." त्यांच्या संवेदना बोथट झाल्याने त्यांना कसल्याही उपकाराची जाणीव नसल्याचा आरोपही पाटील यांनी आबिटकरांवर केला.