मंत्रालयाकडे नांगर खांद्यावर नेत शेतकऱ्याचा संघर्ष ; प्रकृती खालावल्याने ठाण्याच्या रुग्णालयात दाखल

मंत्रालयाकडे नांगर खांद्यावर नेत शेतकऱ्याचा संघर्ष ; प्रकृती खालावल्याने ठाण्याच्या रुग्णालयात दाखल

ठाणे - लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शेतकरी सहदेव होनाळे यांनी हमीभाव आणि कर्जमाफीसाठी मंत्रालयाच्या दिशेने पदयात्रा सुरू केली. खांद्यावर नांगर घेऊन सुरू केलेल्या या लांबच्या प्रवासात, सोमवारी ते ठाण्यात पोहोचताच त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पदयात्रेदरम्यान तब्येत अस्वस्थ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ कॉलद्वारे होनाळे यांच्याशी संवाद साधला व त्यांना धीर दिला. आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना रुग्णालयात जाऊन होनाळे यांची भेट घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

होनाळे यांची मागणी आहे की, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करून कर्जमुक्ती जाहीर करावी, तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर त्वरित उपाय योजना कराव्या. दोन दिवसांपूर्वी भिवंडीमध्ये थांबलेल्या होनाळे यांच्या पायांना फोड आले होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना ठाण्यात दाखल करावे लागले.

व्हिडीओ कॉलमध्ये होनाळे यांनी आपली कैफियत आव्हाड यांना सांगितली. आव्हाड यांनी हा विषय विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले असून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आज होनाळे पुन्हा मंत्रालयाच्या दिशेने निघणार असल्याचं सांगितलं जात आहे.  

पत्रकारांशी बोलताना होनाळे यांच्या डोळ्यांत अश्रू आले. "शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचावा," अशी भावनिक मागणी त्यांनी केली.