महापुराचे संकट रोखण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवावा आणि उच्चस्तरीय समिती नेमावी-खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान 3 लाख क्युसेकने पाणी विसर्ग सुरू करणे आवश्यक आहे. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि महाराष्ट्र कर्नाटक मधील जलसंपदा खात्यांच्या अधिकाऱ्यांत समन्वय ठेवावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांच्याकडे केली.
त्याबद्दलचे पत्र खासदार महाडिक यांनी नामदार पाटील यांच्याकडे नवी दिल्लीमध्ये सुपूर्द केले. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर स्वयंचलित दरवाजे खुले होतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे संकट गंभीर बनते. अशावेळी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान तीन लाख क्यूसेकने पाणी विसर्ग केला, तरच कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची फुग कमी होते. महापुराचे संकट टाळण्यासाठी आणि जीवित व वित्त हानी रोखण्यासाठी, तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढवणे आणि उच्चस्तरीय समिती नेमून, तत्काळ करावयाच्या उपायोजना आणि दीर्घकालीन उपाय योजना तसेच पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे खासदार महाडिक यांनी निवेदनात नमूद केले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या मागणीची गांभीर्याने नोंद घेतली असून, पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे संकट रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे अभिवचन दिले आहे.