महाराष्ट्रातील 'या' गावात काजव्यांचा झगमगाट

अहमदनगर - महाराष्ट्रात एक अनोखं आणि वैशिष्ट्यपूर्ण असणारं गाव म्हणजे पुरुषवाडी. जे काजवा महोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेलं हे गाव दरवर्षी मे - जून महिन्यांत निसर्गप्रेमींना आकर्षित करत असतं. या ठिकाणी हजारो काजवे झगमगाट करताना दिसतात. हा नजारा अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात.
‘पुरुषवाडी’ हे नाव कसं पडलं?
गावाच्या नावामागेही एक मनोरंजक गोष्ट आहे. स्थानिकांच्या मते, या गावाला पूर्वी ‘पुर-उंच-वाडी’, म्हणजेच थोड्याशा उंचीवरील वाडी, असं म्हटलं जायचं. हळूहळू अपभ्रंश होऊन ते ‘पुरुषवाडी’ झालं. आज या गावात केवळ 110 कुटुंबं राहतात, आणि एकूण लोकसंख्या आहे फक्त 626.
काजवा महोत्सव आणि ग्रामीण अनुभव
पुरुषवाडी केवळ काजव्यांसाठी नव्हे, तर निसर्गसौंदर्य, पारंपरिक जीवनशैली आणि ग्रामीण संस्कृतीसाठीही ओळखलं जातं. येथे आलेल्या पर्यटकांना होमस्टे आणि कॅम्पिंगच्या माध्यमातून स्थानिक जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. शेती, पशुपालन, लोकनृत्य, हस्तकला यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळते.
गावाजवळचं हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखर ट्रेकर्ससाठी आकर्षणाचं केंद्र आहे. त्यामुळे काजवांसोबत साहसप्रेमींसाठीही हे गाव पर्वणी ठरतं.