राज्यात पावसाचा जोर वाढणार ; कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई - महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी दाखल झाला असला तरी जूनच्या सुरुवातीला त्यात खंड पडला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यभर पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २५ जूनपर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे.
राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि इतर काही जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. पुणे परिसरात आज सकाळी ढगाळ वातावरण होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. आज मुंबईत आकाशात दाट काळे ढग पाहायला मिळाले, आणि काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला.
भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, नदीकाठच्या गावांना पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः रत्नागिरीसाठी रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि काजळी या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरीत दिवसभर पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत ५६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.