शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू : आ. राजेश क्षीरसागर

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू : आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून, राज्यात महायुती सरकारने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू आणि लाडक्या बहिणींचे आभार मानतो. यासह माझ्या विजयात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या प्रसिद्धी माध्यम, पत्रकार बंधू- भगिनी, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आर.पी.आय.(ए), पी.आर.पी. सह सर्वच मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वच हिंदुत्ववादी संघटना, शहरातील विविध तालीम संस्था मंडळाचे कार्यकर्ते, विविध समाजाचे प्रतिनिधी समाज बांधव, वकील, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, क्रीडाई, व्यापारी, उद्योजक, आर्किटेक्ट, रिक्षावाले, फेरीवाले, कर्मचारी, मित्रमंडळी, नातेवाईक व हितचिंतकांचे जाहीर आभार मानत असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



दि.६ मे १९८६ पासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी कामास सुरवात केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत मी वरिष्ठ म्हणून काम करत आहे. गेली ३८ वर्षे मी शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. २००९ ला मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो.त्यानंतर पुन्हा २०१४ ला आमदार झालो. २०१४ ला शिवसेना - भाजप महायुतीची राज्यात सत्ता आली. यावेळी मंत्री मंडळाच्या यादीत वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आदी माध्यमातून माझे नांव मंत्री पदासाठी अग्रेसर होते. लोकांच्यातही मला मंत्री पद मिळेल अशी चर्चा होती. पण मंत्री पदाने मला हुलकावणी दिली हे माझे व माझे मतदारसंघाचे दुर्दैव म्हणावे लागेल. 

आगामी काळात माझ्या शहराच्या विकासासाठी हद्दवाढ, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, आय.टी. पार्क, फौंड्री हब, औद्योगिक क्षेत्रांचा विकास, ३२०० कोटींचा पूर नियंत्रण प्रकल्प, पंचगंगा प्रदूषण, झूम प्रकल्प, राजाराम बंधारा नवीन पुलाचे काम, रंकाळा तलावाचे उर्वरित सुशोभिकरण, पर्यटन वाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, फुटबॉल अॅकॅडमी, शहरातील रिंग रोड, वाहतूक यंत्रणा, पार्किंग, भुयारी मार्ग, महापालिका गाळेधारक प्रश्न, के.एम.टी.कर्मचारी सेवेत कायम करणे आदी बाबत पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.