संभाजी भिडेंवर कुत्र्याने केला हल्ला , डाव्या पायाचा घेतला चावा

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्याने हल्ला करत भिडे गुरुजींच्या डाव्या पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला.
संभाजी भिडे गुरुजींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रात्री अकरा वाजताच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून आपल्या घरी परत जात असताना कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती आहे.
"शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान" संघटनेचे संस्थापक
संभाजी भिडे हे सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. भिडे गुरुजी हे "शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान" या संघटनेचे संस्थापक आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. अनेक वेळा त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हिंदू संस्कृती, इतिहास या विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुण वर्गाचा पाठिंबा मिळाला आहे.
वाघ्या कुत्र्याविषयी वक्तव्य
संभाजीराजे छत्रपती म्हणाले ते 100 टक्के चूक असल्याचं संभाजी भिडे म्हणाले होते. वाघ्या कुत्र्याची जी कथा सांगितली जाते, ती सत्यच आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली होती. त्याचे स्मारक तिथे बांधण्यात आले आहे. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात असे संभाजी भिडे म्हणाले होते.
संभाजी राजे यांचे वक्तव्य चर्चेत
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे. परंतु या गोष्टीला कुठलाही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी त्याला अनेक वेळा विरोध केला आहे. याआधीही शिवप्रेमींनी तो पुतळा हटवला होता. पण प्रशासनाने तो पुन्हा त्या जागी बसवला आणि पोलीस संरक्षण दिले आहे. नुकतेत संभाजीराजे छत्रपती यांनीही पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली. वाघ्या कुत्र्याची समाधी अलिकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं होतं.