हे कसले पाणीदार आमदार ? आबिटकर दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यात अपयशी - राहुल देसाई

हे कसले पाणीदार आमदार ? आबिटकर दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यात अपयशी - राहुल देसाई

आजरा (प्रतिनिधी) : पाणीदार आमदार, कार्यसम्राट आमदार अशा उपाध्या स्वतःच लावून फिरणारे विद्यमान आमदार मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत दर्जेदार पायाभूत सुविधा देऊ शकले नाहीत. दर्जाहीन कामे जनतेच्या माथी मारणाऱ्या आणि पिण्याच्या व जलसंधारणाच्या पाण्याची गळती न रोखू शकणाऱ्या या आमदारांना कार्यसम्राट व पाणीदार कसे म्हणायचे? असा सवाल बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी केला.

आजरा येथे माजी आमदार के पी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी दत्ता पाटील - कोरीवडेकर म्हणाले," मी व माझ्या सहकाऱ्यांनी विरोधी आमदारांसाठी याआधी प्रामाणिकपणे काम केले ; परंतु त्यांच्या यंत्रणेने आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला. या त्रासाचे उत्तर देण्यासाठी म्हणून मी त्यांना रामराम केला असून आम्हाला रस्त्यावर आणण्याचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही आज उभे ठाकलो आहोत. त्याचाच भाग म्हणून के पी पाटील यांना विधानसभेत पाठविण्याचा आम्ही विडा उचलला आहे."

जी एम पाटील म्हणाले," विद्यमान आमदारांनी आमचे पंख छाटण्याचे काम केले. आम्ही असेच राहिलो असतो तर त्यांनी आम्हाला एक दिवस सरंजामशाहीत नेवून संपवले असते. म्हणूनच आम्ही के पी पाटील यांना पाठिंब्याचा निर्णय घेतला.

यावेळी माजी आमदार के पी पाटील,पक्ष निरीक्षक दिनानाथ चौगले,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, अभिषेक शिंपी, हाजी अस्लम समीर चाँद यांची भाषणे झाली. सभेला मुकुंद देसाई, उपजिल्हाप्रमुख संभाजीराव पाटील, सुधीर देसाई, उदय पवार, राजवर्धन घोलप, विक्रम देसाई, किरण कांबळे, सुधीर सुपल, संजय सावंत, राजू घोलम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

*कामापेक्षा जाहिरात व उद्घाटनेच जास्त*

आमदार आबिटकरांच्या प्रसिद्धीचे तंत्र सांगताना राहुल देसाई म्हणाले, " कामापेक्षा जाहिरात जास्त आणि प्रत्यक्ष मंजुरी पेक्षा उद्घाटनेच जास्त असे यांचे प्रसिद्धीचे धोरण असून पहिल्या पंचवार्षिक मध्ये जनतेला या प्रसिद्धी तंत्राचा भुलभुलय्या झाला; परंतु या पंचवार्षिक मध्ये हे त्यांचे धोरण ओळखले असून याचा फटका विद्यमान आमदारांना या निवडणुकीत नक्की बसेल."