Beed News : पालकमंत्री अजित पवार पहिल्यांदाच परळीत; नेमक्या काय सूचना केल्या?

परळी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज परळी तालुक्याचा दौरा केला. काही महिन्यांपूर्वी बीडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकृत केल्यानंतर परळीतील हा त्यांचा पहिलाच दौरा होता. यावेळी त्यांनी प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि नंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेतला.
अजित पवार यांनी श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, "या प्रकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत."
या बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पवार यांनी स्पष्ट केलं की, वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छता, सुव्यवस्था आणि सुविधा असलेल्या दर्शन मंडपासारखी कामे उच्च दर्जाची असावीत. त्यांनी लाईट अँड साऊंड शो (लेझर शो) च्या कामातही दर्जावर भर देण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी माहिती दिली की, 92 नव्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, एकूण 286.68 कोटी रुपयांच्या खर्चाचे आराखड्याअंतर्गत कामे हाती घेण्यात येणार आहेत.