Govinda Divorce : लग्नाच्या ३७ वर्षानंतर गोविंदा घटस्फोट घेणार?

मुंबई : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहतात. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. दोघांच्याही वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक चाललेलं नाही. गोविंदाचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि त्याचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे अशा चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहेत.
गोविंदाचे विवाहबाह्य संबंध ?
गोविंदाचं एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा घटस्फोट घेणार आहे. सुनीताने अलीकडील अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाच्या अफेअरबद्दल संकेत दिले आहेत. ते दोघेही सध्या वेगवेगळ्या घरात राहत आहेत. .
घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंधांबद्दल गोविंदा आणि सुनीता यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे याची पुष्टी फक्त गोविंदा आणि सुनीताच करू शकतील.
सुनीता आणि गोविंदा राहतात वेगळे
सुनीताने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ती गोविंदासोबत राहत नाही. सुनीता म्हणाली होती की, ते बहुतेक वेगळे राहतात. सुनीता तिच्या मुलांसह फ्लॅटमध्ये राहते. गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो.
३७ वर्षांचा संसार मोडणार ?
गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न १९८७ मध्ये झालं होतं. दोघांचंही लग्न खूप कमी वयात झालं. त्यावेळी सुनीता फक्त १८ वर्षांची होती. सुनीता आणि गोविंदा यांना या लग्नापासून टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सुनीता आणि गोविंदा खरंच वेगळे होणार का याबाबतची खात्रीशीर माहिती काही दिवसातच आता समोर येईल.