IPL 2025 पुन्हा सुरू होणार ; उर्वरित सामने 'या' शहरात खेळवले जाणार

नवी दिल्ली - IPL 2025 रद्द करण्यात आलेली नसून ती फक्त तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आता या स्पर्धेचे उर्वरित सामने लवकरच खेळवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सामन्यांचे आयोजन देशातील कोणत्या शहरांमध्ये होणार याबाबतची स्पष्टता आता झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) उर्वरित IPL सामने चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद या तीन शहरांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सीमारेषांवर वाढलेल्या तणावामुळे पंजाब आणि धरमशाला यांसारख्या सीमेलगतच्या शहरांमध्ये सामने न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील शहरांमध्ये चोख सुरक्षा आणि शांतता असून ती सीमारेषेपासून दूर असल्यामुळे, स्पर्धेच्या सुरक्षित आयोजनासाठी ही शहरे निवडण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्धच्या वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित केली होती. 'सरकारशी चर्चा आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल', असे BCCI चे चिटणीस देवाजित सैकिया यांनी सांगितले होते. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा सामना आणि त्यानंतरचे सर्व सामने स्थगित करण्यात आले होते.
आता, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद येथे उर्वरित सामने खेळवले जातील, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सामने कधीपासून सुरू होतील यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच BCCI याबाबत सविस्तर वेळापत्रक जाहीर करणार आहे, आणि त्यामुळे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता या घोषणेकडे लागले आहे.