फुलराणी पी.व्ही सिंधू बांधणार लग्नगाठ, २२ डिसेंबरला शाही सोहळा
नवी दिल्ली : भारताची फुलराणी बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबाबत सिंधूचे वडील पीव्ही रमण्णा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.२२ डिसेंबरला उदयपूर येथे हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.सिंधूचे वडील पीव्ही रमण्णा यांनी यावेळी सांगितले की, " आम्ही दोन्ही कुटुंब एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. पण सिंधूचे लग्न हे गेल्या महिन्याभराच्या कालावधीत ठरले आहे. सिंधू ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्यामुळे तिचे वेळापत्रक व्यस्त आहे. त्यामुळे सिंधू जानेवारीपाासून व्यस्त होणार आहे. त्यामुळेच डिसेंबरमध्येच लग्न करण्याच आम्ही ठरवले आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांनी हा लग्न सोहळा २२ डिसेंबरला व्हावा, असे ठरवले आहे. त्यानंतर २४ डिसेंबरला हैदराबाद येथे रिसेप्शनही ठेवण्यात आले आहे. पण लग्नानंतर काही दिवसांनी सिंधू आपल्या ट्रेनिंगला सुरुवात करणार आहे."
सिंधू कोणाशी बांधणार लग्नगाठ ?
सिंधूचे लग्न हे वेकंट दत्ता साई यांच्याशी होणार आहे. वेकंट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजिसमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी वेंकट दत्ता साई यांचे नाव प्रकाशझोतात आले नव्हते. पण सिंधूच्या कुटुंबियांशी त्यांचे बऱ्याच वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्ता साई हे एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत असावेत, असे म्हटले जात आहे. २२ डिसेंबरला आता सिंधूचा विवाह सोहळा उदयपूर येथे होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २४ डिसेंबरला सिंधूच्या लग्नाचे रिसेप्शन हे हैदराबाद येथे होणार आहे.
सिंधूच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधू हिच्या शिरपेचात अनेक मनाचे तुरे आजवर रोवले गेले आहेत. भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकवून देणारी सिंधू ही पहिली बॅडमिंटन खेळाडू ठरली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते, त्यानंतर टोकिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर बॅडमिंडनध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती भारताची पहिलीच आणि एकमेव खेळाडू ठरलेली आहे.