मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल तर ... काय म्हणाले राज ठाकरे ?

मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल तर ... काय म्हणाले राज ठाकरे ?

मुंबई : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल, तर आम्हाला प्रगती नको, अशी परखड भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास राज्यातील काही शाळांमध्ये शिकवला जात नसल्यावरुनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते. 

काय म्हणाले राज ठाकरे ?

'वास्तव में ट्रुथ' या महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे बोलत होते. या मुलाखतीचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यात राज ठाकरे म्हणतात, की "आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारुन मराठी या गोष्टीकडे पाहणं, मला असं वाटतं आवश्यक आहे. नुसतंच भाषा दिवस साजरा करणं किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणं, याने फक्त मराठी नाही राहणार आहे."

राज ठाकरे पुढे म्हणाले, की "मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून समजा प्रगती होणार असेल ना, तर नको आम्हाला प्रगती. आज जे काय फ्लायओव्हर, ब्रिज वगैरे जे होत आहेत, दिसायला छान आहे, पण यातून मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल. तर नकोय ते आम्हाला." अशी परखड भूमिका राज ठाकरेंनी घेतली.