RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचं पहलगाम हल्ल्याबाबत मोठं विधान, म्हणाले....

RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचं पहलगाम हल्ल्याबाबत मोठं विधान, म्हणाले....

मुंबई : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या घटनेचा निषेध करत हल्ल्याला "धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई" असे संबोधले.

भागवत म्हणाले की, दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून नंतर त्यांची निर्घृण हत्या केली. ही घटना केवळ हिंसाचार नाही, तर धर्माविरुद्ध अधर्माने उभारलेली लढाई आहे. आता देशाने आपली शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "संपूर्ण देशात दु:ख आणि संताप आहे. अशा हल्ल्यांना थोपवण्यासाठी समाजात एकता अत्यावश्यक आहे. वाईटाचा अंत करण्यासाठी आपण सामूहिक शक्तीने उभं राहायला हवं."

आपल्या भाषणात त्यांनी राम-रावणाच्या युद्धाचे उदाहरण देत स्पष्ट केले की, काही लोकांना समजावून काही उपयोग होत नाही अशांवर कठोर कारवाई हवी. "मला खात्री आहे की अशा प्रवृत्तींना लवकरच धडा शिकवला जाईल," असे ते म्हणाले.

भागवत आणखी ठाम भूमिका घेत म्हणाले, "जर आपण सर्वजण एकत्र उभं राहिलो, तर कोणीही आपल्यावर वाईट नजर टाकण्याची हिंमत करणार नाही. आणि कोणी जर असं केलंच, तर त्याचे डोळे उपटून टाकले जातील." ते पुढे म्हणाले की, "आपण कुणाचा द्वेष करत नाही, पण शांतपणे सहन करणं हे देखील आपल्याला मान्य नाही. खरी अहिंसा ही शक्तीवर आधारलेली असते."