Women's Day Special : बायऱ्या बायऱ्या लढणाऱ्या... 'त्या' वयाच्या ९२ वर्षीही करताहेत संघर्ष

नाशिक : झिलाबाई वसावे वय वर्षे ९२. सातपुड्यातील आदिवासींना त्यांच्या हक्काच्या वनजमिनी मिळायलाच हव्यात हा निर्धार मनाशी बाळगून संपूर्ण आयुष्य पणाला लावणारी ही स्त्री.
आदिवासींच्या जंगल- जमिनीसाठी आंदोलन करणाऱ्या समाजसेविका मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांच्यापेक्षा दोन पावले पुढे राहून ‘आमू आखा एक से’, ‘बायऱ्या बायऱ्या लढणाऱ्या, नवनिर्माण करणाऱ्या’ या घोषणेतून आदिवासींच्या संघर्षाला नवी धार ही महिला देत आहे. भाषेची बंधने झुगारून त्या आदिवासी महिलांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रेरणास्रोत बनल्या आहेत.
सरदार सरोवर प्रकल्पामुळे उभे राहिलेले ‘नर्मदा आंदोलन’ हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. मेधा पाटकर आणि प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या आंदोलनामुळे येथील आदिवासी जंगल आणि जमिनीवरचा हक्क आता कुठे परत मिळतोय. मात्र, या आंदोलनात रायसिंगपूर संस्थेतील भराडीपादर गावातील झिलाबाई या आदिवासी महिलेचा संघर्ष दुर्लक्षितच राहिला. मूळच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील झिलाबाई लग्नानंतर महाराष्ट्रात आल्या. १९७५ मधील प्रायव्हेट फॉरेस्ट ॲॅक्टने आदिवासींचा जंगल व जमिनीवरचा हक्क हिरावला गेला.
२००६ मध्ये थेट दिल्लीत संसदीय समितीसमोर धडक
या कायद्याने जंगलातील मूळ निवासी आदिवासी हद्दपार होऊन आदिवासींचे हक्क नाकारल्यानंतर झिलाबाईंच्या संघर्षाला सुरुवात झाली. २००६ मध्ये थेट दिल्लीत संसदीय समितीसमोर धडक दिली. २०१० मध्ये नंदुरबार ते मुंबई अशी पदयात्रा काढून सरकारचे भान ठिकाणावर आणतात. या लढ्यात त्यांचे पती गिमल्या वसावेंची मोलाची साथ होती. मात्र, गेल्या वर्षीच पतीचे निधन झाले. तरीही त्या खचल्या नाहीत. कुटुंब सांभाळून ९२ व्या वर्षी त्या लोकसंघर्ष मोर्चाच्या आंदोलनात सक्रिय असतात.
स्वातंत्र्यानंतरही आदिवासींना लढावे लागत असल्याची खंत : झिलाबाई वसावे, (नर्मदा आंदोलक, नंदुरबार)
आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी नंदुरबार, मुंबई, दिल्लीला जाऊन संघर्ष केला. त्यामुळे आदिवासींना कुठे वनहक्काच्या जमिनी परत मिळत आहेत. स्वातंत्र्यानंतरही शिक्षण, रोजगार, आरोग्यासाठी आदिवासींना लढावे लागत असल्याची खंत आहे.