न्यू कॉलेजमध्ये ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा

न्यू कॉलेजमध्ये ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा

न्यू कॉलेजमध्ये ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा
‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा

सुभाष भोसले / प्रतिनिधी

श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे न्यू कॉलेज, कोल्हापूर भूगोलशास्त्र विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर भूगोलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू कॉलेज येथे ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. 

जागतिक ओझोन दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या भूगोल विभागातील डॉ. एम. डी. कदम व  डॉ. बी. बी. घुरके यांना निमंत्रित करण्यात आले होते. पहिल्या सत्रात डॉ. बी. बी. घुरके यांनी जागतिक ओझोन दिन का साजरा करतात? ओझोन दिनाचा इतिहास, ओझोन थराची निर्मिती, ओझोनचा शोध, ओझोनचे महत्व, ओझोनच्या ऱ्हासाची कारणे, परिणाम आणि ओझोन थर जतन संदर्भात उपाययोजना यावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदशन केले. 

ओझोनचे संरक्षण करणे काळाची गरज : प्रा. डॉ. बी. बी. घुरके 

डॉ. घुरके म्हणाले, ओझोनच्या ऱ्हासामुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून परिसंस्था चक्रात बदल होत आहेत. शेती उत्पादनात घट होत असून वनस्पतींच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहेत. धुक्यांची निर्मिती, त्वचा रोगात वाढ होऊन कर्करोग, मोतीबिंदू सारखे डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. जनुकीय बदल होऊन संपूर्ण मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ओझोन संवर्धनासाठी अनेक उपाय सांगून ओझोनचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन डॉ. बी. बी. घुरके यांनी केले.   

दुसऱ्या सत्रात भूगोल विभागप्रमुख डॉ. एम. डी. कदम व डॉ. आर. बी. भास्कर यांनी ‘जीवावरणाच्या संवर्धनासाठी ओझोनचे महत्व” या विषयावर मार्गदर्शन केले. ओझोन दिनानिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा व पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. आर. डी. ढमकले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवून मार्गदर्शन केले. भूगोल विभागप्रमुख डॉ. आर. बी. भास्कर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. व्ही. एस. पवार-पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. संपदा टिकेकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी डॉ. ए. एच. पाटील, प्रा. प्रशांत पोवार तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.