अपघातानंतर उर्मिला कानेटकर पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला , रसिकांची दाद

अपघातानंतर उर्मिला कानेटकर पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला , रसिकांची दाद

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : 'का मी नाही करू शकणार हँडल? तुम्ही पुरुष म्हणजे पराक्रमी आम्ही बायका म्हणजे गरीब बिचाऱ्या अवला...' आणि दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. निमित्त होतं; महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित 'फिल्टर कॉफी' या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाचं. पहिलंवहिलं व्यावसायिक नाटक करणाऱ्या उर्मिलासाठी नाट्यरसिकांकडून मिळालेली ही पहिलीच दाद होती. या नाटकात उर्मिला अनु ही व्यक्तिरेखा साकारत आहे. 

'कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमधून काम केलं. पण, त्यानंतर बावीस एक वर्षांनी मी व्यावसायिक नाटकासाठी रंगभूमीवर उभी राहिले. पहिलाच प्रयोग असल्यामुळे दडपण होतं. परंतु, समोर बसलेल्या प्रेक्षकांची ऊर्जा स्पॉटलाइट खाली बसलेल्या माझ्यात संचारल्याची जाणीव झाली. नाटकाचं वेड काय असतं? हे मला याचि देही अनुभवता आलं. प्रत्येक गोष्टीची एक अचूक वेळ असते; ती गोष्ट तेव्हाच घडते. त्या रंगमंचाच्या अवकाशाची वेळ माझी होती. गेल्या वीस एक वर्षांच्या प्रवासात समाधानाच्या जवळ घेऊन जाणारा हा क्षण होता", असं उर्मिलानं सांगितलं.

... आणि 'त्यांनी' उर्मिलाला प्रकाशझोतात उभं केलं

'अलीकडेच माझा अपघात झाला होता. त्यातून उभं राहताना; मला काम सुरू करायचं होतं. प्रत्यक्ष समोर बसलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद मला अनुभवायचा होता. त्यामुळे मी अनेक नाट्यदिग्दर्शकांना मला नाटक करायचंय असं सांगितलं. अचानक एकदा नाटक पाहायला गेले असता मध्यंतरात महेश मांजरेकर यांच्याशी भेट झाली. लगेचच; 'नाटकात काम करणार का?' असं त्यांनी विचारलं. नाटक करण्याची इच्छा मी त्यांना कधीच बोलून दाखवली नव्हती. कारण, बऱ्याच वर्षात त्यांनीही व्यावसायिक नाटक केलं नव्हतं. पण, त्यांनी माझ्यासारख्या व्यावसायिक रंगभूमीसाठी नवोदित असलेल्या उर्मिलाला प्रकाशझोतात उभं केलं', असं उर्मिला म्हणाली.

ऊर्जा देणारं असं 'फिल्टर कॉफी' 

"नाटक ही एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. नाटकातला स्त्रीवाद समकालीन आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं 'फिल्टर कॉफी' हे नाटक पाहावं. आयुष्यातल्या चढ-उतारात तुम्हाला 'पुश' करणारं, ऊर्जा देणारं असं हे नाटक आहे.