अमल महाडिक प्रचंड मतांनी विजयी होणार - शौमिका महाडिक

अमल महाडिक प्रचंड मतांनी विजयी होणार - शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्रचारादरम्यान गावागावातील सभा व पदयात्रांच्या माध्यमातून मी लोकांशी संवाद साधते आहे. महिला भगिनी माझ्यासोबत त्यांच्या भागातील समस्या मांडत आहेत. पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन यासारखे त्यांचे मूलभूत प्रश्नही प्रलंबित असल्याचे त्या सांगत आहेत. सर्वाना त्यांचे हे प्रश्न सोडविणारा नेता हवा आहे. अमल महाडिक तो नेता आहेत, असा विश्वास त्यांच्याकडूनच व्यक्त होत आहे. त्यामुळे अमल महाडिक प्रचंड मतांनी निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. 

मुडशिंगी येथे कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. "मतदारसंघातील महिलांचे पायाभूत सुविधांचे, युवकांचे रोजगाराचे, गरीब मुलांच्या शिक्षणाचे असे अनेक प्रश्न जैसे थे आहेत. नागरिकांना आता प्रत्यक्ष विकासाची अपेक्षा आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यावर गांभीर्याने शाश्वत उपाययोजना करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून अमल यांनी केलेल्या कामाचे त्यांना अप्रूप आहे. हातात कोणतेही पद नसताना कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यांनी केलेले लोकांची केलेली कामे, यामुळे ते सर्वांचे हक्काचे नेतृत्व झाले आहेत. जनतेने त्यांना आधीच लोकनेत्याची पदवी बहाल केली आहे." असे त्या म्हणाल्या. 

"आज गावागावातील महिला त्यांना आपला हक्काचा भाऊ मानत आहेत. वळिवडे गावातील आजींनी त्यांना प्रचारासाठी दिलेले पैसे याच भावनेतून दिले होते. पदयात्रेला फिरत असताना महिलांनी त्यांना हातभर बांधलेल्या राख्या हेच सांगतात. काहीही झाले तरी आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत असे सांगणाऱ्या महिला, युवा आमची ताकद होत आहेत. नेहमी समाजकारणाला प्राधान्य देणारा अमल यांचा मूळ स्वभाव सर्वानी ओळखला आहे. आणि जनतेची प्रचंड ताकद त्यांच्यासोबत उभी राहिली आहे." असे त्यांनी त्यांनी सांगितले. 

"राज्यभरात सध्या महायुती च्या विकासात्मक धोरणांची चर्चा आहे. पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. येणाऱ्या काळातील सरकारचा विकासाचा अजेंडा सर्वांच्या पसंतीस उतरतो आहे. महिला पोलिसांची भरती, शेतकरी वीज बिल माफी ही कधीही न झालेली कामे आता होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या होतकरू तरुणींना उच्च शिक्षणाचा मार्ग आता खुला झाला आहे. सर्व घटक केवळ आणि केवळ महायुती सोबत आहेत." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व मुडशिंगीचे माजी सरपंच तानाजी पाटील, गावचे ज्येष्ठ नेते पंडित पाटील (अण्णा), पंचगंगा पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापुर दक्षिणा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासो धनवडे, अविनाश कांबळे, मीनाक्षी महाडिक (काकी), रूपाली पाटील, अशोक दांगट, कृष्णा दांगट, वैशाली दांगट, संजय सातपुते, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.