आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याचा इंडिया आघाडी कडून निषेध

आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याचा इंडिया आघाडी कडून निषेध

कोल्हापूर (प्रतिनिधि) : इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काल ठाण्यात आपल्या मतदारसंघात फिरत असताना अचानकपणे काही तरुणांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

विशाळगड दंगली संदर्भ आपले प्रखर मत व्यक्त केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे संस्कृत दर्शनी दिसत आहे. स्वराज्य पक्षाने हल्ला केल्याबाबत वृत्तपत्रांमध्ये दिसून येत आहे. परंतु हा हल्ला नुसता विशाळगडा बाबतचा नसून हा एकंदरीत लोकशाही वरचा हल्ला आहे नेमका हा महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांना कोणत्या दिशेने घेऊन जावयाचा आहे हा मूळ प्रश्न आहे या हल्ल्या पाठीमागे नुसता स्वराज्य पक्ष व विशाळगड घटना नसून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा दंगलीच्या घटना घडवून आपल्या पदरात काय पडते का हे पाहण्याचाच एक प्रयत्न आहे या पाठीमागे कोणती शक्ती आहे हे ओळखून येत आहे. 

आमदार जितेंद्र आव्हाड हे शाहू फुले आंबेडकर या विचारावर निष्ठा असणारा व छत्रपती शिवरायांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारा व शरद पवार यांचा खंदा समर्थक आहे म्हणून आज रोजी महाराष्ट्रात ते वावरत आहेत असे असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून जे काही षडयंत्र रचण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये कदापही अशा प्रवृत्तींना यश येणार नाही कारण हा महाराष्ट्र छत्रपतींच्या विचारावर अरुढ झालेला व संतांची , विचारवंतांची शक्ती लाभलेला हा महाराष्ट्र आहे त्यामुळे कितीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो महाराष्ट्रात चालणार नाही हे बाकी नक्की काही लोकांना विशाळगड प्रकरण महाराष्ट्रभर पेटवायचे होते परंतु कोल्हापूरच्या समर्थ नेतृत्वाने ठणकावून सांगितले आहे आम्ही कोल्हापूर वाले हे प्रकरण मिटवायला समर्थ आहोत. सदरचे प्रकरण समर्थपणे मिटवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला असताना असे भ्याड कृत्य करून महाराष्ट्र मध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी काही लोक जाणून बुजून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

तरी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन जाती धर्मामध्ये भेद निर्माण होऊ नये म्हणून शांत बसावे असे इंडिया आघाडीच्या वतीने आवाहन करीत आहोत. तरी देखील काही प्रवृत्ती अशा प्रकारच्या घटना घडवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना जसाच तसे उत्तर देण्याची वेळ येऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी.

या हल्ल्याचा आम्ही कोल्हापुरातील तमाम इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या पासून ते कार्यकर्त्यांच्या पर्यंत तीव्र शब्दात निषेध करत आहोत. जेवढा तुम्ही आवाज आमचा दाबायचा प्रयत्न कराल तितकाच तो अधिक प्रबळ होईल हे लक्षात ठेवा 2024 च्या विधानसभेसाठी सर्वांनी सावध राहून अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी दक्ष रहावे असे पत्रक इंडिया आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

या निषेध पत्रकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश संघटक सचिव विनय कदम, काँ. दिलीप पवार, माकप राष्ट्रीय समिती सदस्य काँ.प्रा. सुभाष जाधव, भाकप जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, आप आदमी पार्टीचे प्रदेश सचिव संदीप देसाई व शहर महासचिव अभिजीत कांबळे, काँग्रेस पक्षाचे भरत रसाळे, सीपीआयएमसीचे विवेक गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख उबाठा पक्षाचे विजयराव देवणे, राष्ट्रवादी भुदरगडचे दत्तात्रय गुरव यांच्या सह्या आहेत.