आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करूनच मते मागायला आलोय - ना. हसन मुश्रीफ

आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करूनच मते मागायला आलोय - ना. हसन मुश्रीफ

उत्तूर (प्रतिनिधी) : आंबेओहळ प्रकल्पाची पूर्तता करून पाणी अडवूनच तुमच्याकडे विधानसभेसाठी मते मागायला येऊ, हा शब्द मी पाळला आहे. मी वचन पाळले आता जबाबदारी तुमची आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

होन्याळीसह चव्हाणवाडी, करपेवाडी, धामने, झुलपेवाडी येथील प्रचार बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. आजरा साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शिरीष देसाई, दीपक देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ तेली, शिवाजी भोसले, स्वागत परुळेकर आदी उपस्थित होते.

 

धामणे येथे बाळकृष्ण धामणकर यांनी मंत्री मुश्रीफ यांना असंख्य कार्यकर्त्यांसह पाठिंबा दिला. 

 

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आंबेओहळ प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडला होता. मात्र याबाबत आपण वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात असंख्य बैठका घेतल्या. शेवटी शासनाच्या धोरणानुसार आंबेओहोळ प्रकल्पाला हेक्‍टरी ३८ लाख रुपये भरपाई देऊन स्वेच्छा पुनर्वसन करण्याचे मान्य केल्यानंतर या धरणाच्या कामाला गती मिळाली. तत्कालीन परिस्थितीत काही तांत्रिक अडचणीमुळे थोड्याफार शेतकऱ्यांचे पुनर्वसन व्हायचे आहे. ते पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, उत्तुर परिसराच्या हरितक्रांतीचे प्रणेते हसन मुश्रीफच आहेत. त्यांच्या माध्यमातून हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या अभूतपूर्व कार्याचा महिमा पिढ्यानपिढ्या चिरंतन दरवळत राहील.

यावेळी काशिनाथ तेली, शिरीष देसाई, सुधीर देसाई, दीपक देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. 

होन्याळी येथे अनिल बिरंबोळे, भैरू मुळीक, सागर सरूळकर, राजू पाटील, राजू देशपांडे, संभाजी पाटील, करपेवाडी येथे मच्छिंद्र कडगावकर, युवराज बोटे, प्रभाकर कांबळे, दत्तात्रय मोडे, विठ्ठल कदम, शंकर यजरे आदी उपस्थित होते. 

धामणे येथे स्वागत व प्रास्ताविक महादेव पाटील यांनी केले.

भाजपची सूज गेली......!

येथील प्रमुख कार्यकर्ते भाजपचे प्रमुख कार्यकर्ते राजू देशपांडे म्हणाले, समरजीत घाटगे पक्ष सोडून गेल्यानंतर भाजपमधील कुणीही मोठा नेता अथवा कार्यकर्ता हलला नाही. फक्त आमच्या पक्षाची सूज उतरली इतकेच......!

तो डावही जनता उलटवून लावेल......

 राजू देशपांडे म्हणाले, विरोधक सांगत आहेत की वस्तादाने एक डाव राखून ठेवला आहे. परंतु; २००९ साली वस्तादाने राखून ठेवलेला डाव इथल्या जनमाणसाच्या आधारे कसा उलटवू शकतो, हेही दाखवून दिले आहे. या विधानसभा निवडणुकीतही इथली जनता वस्तादाने असा राखून ठेवलेला डाव निश्चितच उलटवून लावेल.