आकुर्डे एमआयडीसीची जागा हडप करता; मग रोजगार निर्मितीवर कशाला बोलता ?- के. पी. पाटील
भुदरगड ( प्रतिनिधी) : गारगोटीतील राहत्या घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आकुर्डे येथील मंजूर एमआयडीसीची तब्बल २७ एकर जागा हडप करणारे आमदार इतरत्र एमआयडीसीत काम करणाऱ्या युवकांचे केवळ मतांसाठी मेळावे घेऊ लागले आहेत. मंजूर असलेली एमआयडीसी ची जागा स्वतःच्या फायद्यासाठी हडप करता आणि मग रोजगार निर्मितीवर कशाला बोलता ? असा घणाघात माजी आमदार के पी पाटील यांनी आमदार आबिटकर यांच्यावर केला.
पांगिरे (ता.भुदरगड) येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
या सभेत केवळ युवक आणि बेरोजगारीला केंद्रस्थानी ठेवून के पी पाटील यांनी आबिटकर यांच्यावर हल्लाबोल केला.
ते म्हणाले,"मतदार संघात गेल्या दहा वर्षांत यांनी एकही उद्योग किंवा विकासाचा प्रकल्प राबविला नाही. याउलट आकुर्डे येथे माजी आमदार बजरंग देसाई आणि आमच्या प्रयत्नातून मंजुर केलेली एमआयडीसी यांनी रद्द करून युवक कसा बेरोजगार राहील असेच प्रयत्न केले. परिणामी इथले युवक रोजगारासाठी कोल्हापूर पुणे मुंबई अशा शहरांकडे धाव घेत आहेत. जर विद्यमान आमदारांनी असे प्रकल्प शासनाला उभा करण्यास भाग पाडले असते तर इथल्या युवकाला इथेच रोजगार मिळाला असता ;परंतु यांना युवक केवळ मतदान आणि प्रचारासाठी हवे असून त्यांचे युवकावरील प्रेम हे निव्वळ 'पूतना मावशीचे' आहे हे आता लपून राहिलेले नाही. एवढेच नाही तर एमआयडीसीसाठी अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाचे तसे शेरे असूनही आपण हडप केलेल्या जमिनीवरचे शेरे मात्र सत्तेच्या जोरावर शासनाकडून काढून घेणाऱ्या या लँड माफिया आमदारांचा जमीन घोटाळा सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही समजला आहे."
अशोकराव साळोखे यांनी स्वागत व विश्वनाथ कुंभार यांनी प्रास्ताविक केले. जगदीश पाटील,अश्विनी भोपळे,बाळासाहेब जाधव,अशोक यादव, सचिन पाटील यांची भाषणे झाली.
फिरोजखान पाटील, पंडितराव केणे, विष्णू घोटणे, अरुण बेलेकर, धनाजी पाटील, तानाजी कदम, बाळासाहेब खतकर, विठ्ठल गुरव, बाळासाहेब डेळेकर,रमेश गायकवाड,डॉ.संजय पाटील आदी उपस्थित होते.
*युवा पिढी बेरोजगार... मात्र यांच्या दहा पिढ्यांचा उद्धार !*
के पी पाटील म्हणाले,"दहा वर्षांत मिळवलेल्या कमिशन,टक्केवारी आणि भागीदारी ऐवजी जर उद्योगधंदे उभा करण्यासाठी प्रयत्न केले असते तर मतदारसंघाचा बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी तरी सुटला असता; परंतु निवडणुकीसाठी ज्यांचा वापर करायचा असे युवक बेरोजगार ठेवायचे आणि एमआयडीसीची जमीन हडप करण्याबरोबरच विकासकामातून बक्कळ कमिशन मिळवायचे हे सूत्र आता युवकांना चांगले समजले आहे. त्यामुळे गावोगावी 'युवा पिढी बेरोजगार.... आणि यांच्या दहा पिढ्यांचा उद्धार' अशी टॅग लाईन सोशल मीडियावर जोरात फिरू लागली आहे."