मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आता 'या' नेत्याची एंट्री
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने भरघोस मतांनी विजय मिळवला.महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवत मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला. परंतु पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी शिंदे गटाची मागणी होती. मात्र दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असा निरोप शिंदेंना दिला. यामुळे गेल्या चार दिवसांपासून घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी नंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं जाहीर केले. यानंतर फडणवीसांचा मार्ग मोकळा झाला.
आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडत नाहीत तोच भाजपचे नेते विनोद तावडे यांचं नाव पुढं आलंय. विनोद तावडे हे भाजपचे महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व असून सध्या ते राष्ट्रीय संघटनेत कार्यरत आहेत. विनोद तावडे यांना महाराष्ट्रात पाठवल्यास देवेंद्र फडणवीसांचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु तूर्तास तरी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे ,फडणवीस आणि पवार यांच्यात बैठक होणार असून मुख्यमंत्री कोण होणार याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.