आवश्यक ठिकाणी स्थलांतर करण्याचे पालकमंत्री यांचे आवाहन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पावसाचा जोर कमी झालेला आहे मात्र अजूनही पाणी पातळीत थोडी थोडी वाढ होत आहे. फक्त धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून पुराचा धोका टळलेला नाही. म्हणून प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी स्थलांतर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आंबेवाडी येथील पुरभागात भेट दिल्यानंतर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी तसेच इचलकरंजी या पुरग्रस्त भागाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान कुरुंदवाड, नृसिंहवाडी या भागातील सुमारे 50 कुटुंबियांचे स्थलांतर झालेल्या निवारागृहात जावून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पुरग्रस्त भागात आवश्यकता पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतील निधीमधूनही मदत करु असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.
निवारागृहात स्थलांतरीत करण्यात आलेल्या कुटुंबियांची योग्य ती काळजी घेतली जात असून आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. सोबतच आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था या निवारागृहात केली आहे. कुरुंदवाड येथे कालपासून सुरू झालेल्या निवारागृहात तातडीने जेवण तसेच इतर आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी स्थानिक माध्यमांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, हिप्परगी आणि अलमट्टी या धरणामधून ३ लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कर्नाटक सरकारसोबत पाणी विसर्गाबाबत योग्य नियोजन सुरु आहे. याबाबत प्रशासन हे कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे.
स्थानिक प्रशासनासोबत पुरस्थितीबाबत आढावा
शिरोळ तहसील कार्यालयात स्थानिक प्रशासनाबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुरस्थितीबाबत आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजारापेक्षा जास्त कुटुबियांना स्थलांतरीत केले आहे. यावेळी सर्वांनी दक्ष राहून नागरिकांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, आमदार प्रकाशराव आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, उप विभागीय अधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.