'इंडियन पोलीस मित्र भारत' संघटनेची स्वच्छता मोहीम संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर-संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंडियन पोलीस मित्र भारत या संघटनेने पंचगंगा नदीच्या काठावरील परिसर दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी साफसफाई केली. पंचगंगा संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्लोज व घमेली याची व्यवस्था केली होती. इंडियन पोलीस मित्र भारतचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व कोअर कमिटीचे अध्यक्ष लहू कांबळे यांच्या नियोजनानुसार पंचगंगा घाट साफसफाई सुरळीत पार पडली.
कोर कमिटीचे सदस्य नारायण लोहार यांनी संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छते विषयी माहिती दिली. संत गाडगेबाबा स्वतः एखाद्या गावात जाऊन खराटा हातात घेऊन परिसर स्वच्छ करायचे. हे पाहून त्या गावातील लोक हातात झाडू घेऊन आपला परिसर स्वच्छ करायचे. आपोआपच संपूर्ण गाव कचरा मुक्त व्हायचे. गाडगे बाबांच्या या कार्यामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्व समजले. तसेच संध्याकाळी संत गाडगेबाबा त्या गावात कीर्तन घ्यायचे कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण म्हणजेच वाईट विचार नष्ट करण्याबद्दल शिकवण देत असत. भक्ती संप्रदायाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली त्यावर संत तुकोबांनी कळस चढवला आणि संत गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर संप्रदायाची पताका फडकावली.
गाडगे बाबा तसे नास्तिक संत होते .देवापुढे पैसा, फळे, नैवेद्य ठेवू नका. नवस करू नका असा उपदेश कीर्तनातून करायचे. देव शोधायचा असेल तर तुम्ही माणसांची सेवा करा असा संदेश त्यांनी दिला. म्हणून संत गाडगेबाबांना माणसात देव शोधणारा संत असे म्हटले जाते. त्यांच्या या शिकवणीमुळेच लोकांच्या मनात स्वच्छतेची भावना निर्माण झाली व मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य पटले.
इंडियन पोलीस मित्र भारत या संघटनेच्या कार्याबद्दल पंचगंगा घाट संवर्धन समितीचे पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. व सहकार्याबद्दल आभार मानले. साफसफाई मोहिमेच्या कार्यक्रमास इंडियन पोलीस मित्र भारत कोर कमिटीचे अध्यक्ष लहू कांबळे, नारायण लोहार, अमर चौगुले, कस्तुरी निकम, दिलीप शेटी, लता चौगुले, संजय पाटील, अनिता पाटील, जयश्री जांभळे, निर्मला परीट, उमा संकपाळ तसेच इतर सर्व पोलीस मित्र पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेचे स्वच्छता दूत यांनी इंडियन पोलीस मित्र भारतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.