एकतर्फी खून प्रकरणातील आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
ठाणे : ठाणे येथील तरुणीचा सहा वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. आकाश पवार असे आरोपीचे नाव असून तो भिवंडीतील काल्हेर येथे राहत होता. ठाण्यातील पूर्व द्रुतगर्ती मार्गावर सहा वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे ठाणे चांगलेच हादरले होते.
ठाणे पूर्व भागात दुर्दवी २१ वर्षीय तरुणी राहत होती. ती ठाण्यातीलच नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. याचबरोबर ती अर्धवेळ नोकरीही करत होती. आरोपी आकाश पवार बरोबर तिची फक्त मैत्री होती. मात्र, तिने नंतर हि मैत्री संपवली होती. हि घटना घडण्याच्या आधी काही दिवस आकाश याने तिला मारहाण करत धमकी दिली होती. याबाबत तरुणीने कापुरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. तरीही आरोपीने तिचा पिच्छा सोडला नव्हता.
४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजता ही तरुणी दुचाकीवरुन कामाला निघाली होती. तिच्या मागोमाग आकाशही दुचाकीवरुन जात होता. पूर्व द्रुतगती मार्गावर तिला आडवून त्याने तिच्यावर सपासप वार केले. एकूण तेरा वार केल्याने तरुणी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळली. हल्ला केल्यानंतर आकाश पळून गेला. वाहतूक पोलिस आणि इतर लोकांनी तरुणीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
नौपाडा पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली. पोलिसांचा तपस सुरु असतानाच आकाश भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात हजार झाला. पोलिसांच्या चॊकशीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून झाल्याचे समोर आले.
तत्कालीन पोलिस निरीक्षक अविनाश सोंडकर यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या न्यायालयात चालू होती. सरकारी पक्षाने एकूण १३ साक्षीदार तपासले. साक्षी, पुराव्याच्या आधारे न्यायाधीश अग्रवाल यांनी बुधवारी आकाश याला जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठवला. दंड न भरल्यास एक वर्षांचा साधी कारावासाची शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. इतरही कलमातंर्गत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. ए. पी. लाडवंजारी यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.