‘ऑपरेशन सिंदूर’ चा ‘मुंबई इंडियन्स’ला होणार फायदा, जाणून घ्या कसा ?

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केंद्र सरकारने उत्तर भारतातील, विशेषतः भारत-पाकिस्तान सीमेवरील काही महत्त्वाच्या विमानतळांना १० मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चंडीगड आणि धरमशाला येथील विमानतळही बंद करण्यात आले आहेत. परिणामी, ११ मे रोजी धरमशाला येथे होणारा मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील IPL सामना आता मुंबईत खेळवला जाणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट मंडळाने दिले आहेत. दरम्यान, आज (८ मे) होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याबाबतही अनिश्चितता कायम आहे.
भारतीय क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमशाला येथील विमानतळ बंद झाल्यामुळे सामन्याचे आयोजन शक्य नसल्याने सामना मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “पंजाब” आणि “दिल्ली” यांच्यातील सामन्याबाबतही अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या मंजुरीवर अवलंबून आहे. धरमशाला हे भारत-पाकिस्तान सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही पावले उचलण्यात आली आहेत.
सामन्याचे ठिकाण बदलल्यामुळे मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानाचा मोठा फायदा मिळणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईला प्ले-ऑफ शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक आहे. मागील सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागल्यानंतर, आता घरच्या मैदानावर संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धरमशाला आणि चंडीगड विमानतळ बंद होण्याच्या आधीच पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघ धरमशाला येथे दाखल झाले आहेत. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी सांगितले की, अद्याप IPL सामन्याबाबत अधिकृत सूचना आलेली नाही. त्यामुळे सामना नियोजित वेळेनुसार होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.
मुंबई इंडियन्स संघाला धरमशालासाठी चंडीगडहून प्रवास करायचा होता, मात्र चंडीगड विमानतळही बंद झाल्याने हा प्रवास कठीण झाला. चंडीगड ते धरमशाला सुमारे सहा तासांचा प्रवास आहे. खेळाडूंसोबत संघमालक, निमंत्रित आणि काही चाहतेही प्रवास करतात, त्यामुळे या निर्णयाचा विचार केल्यावर सामना मुंबईत हलवण्यात आला, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.
उत्तर भारतातील अन्य शहरांमध्ये नियोजित असलेल्या सामन्यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज (८ मे) होणारा पंजाब किंग्ज – दिल्ली कॅपिटल्स सामना, तसेच लखनऊ – बेंगळुरू (९ मे), दिल्ली – गुजरात (११ मे), राजस्थान – पंजाब (१६ मे) यासारख्या सामन्यांबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे.