कणेरीवाडी पाणी योजनेत खोडा घालण्याचे महाडीकांचे पाप- शशिकांत खोत
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोणतेही ठोस काम न करणारे अमल महाडिक खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. कणेरीवाडीसाठी जलजीवन योजनेतून होणा-या पिण्याच्या पाणी योजनेत खोडा घालण्याचे काम महाडीकांनी केले. ही योजना रद्द करण्यासाठी दोघां भावांनी पत्रसुध्दा दिले, अशा महाडिकांना धडा शिकवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कणेरीतील विठ्ठल रुखमाई चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.
खोत पुढे म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांनी कणेरी परिसरात कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. विरोधकांकडे सांगण्यासारखा कोणताच मुद्दा नसल्याने चुकीची माहिती देणारे फलक लावून ते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार व खासदार अशी तीन-तीन पदे घरात असतानाही महाडीकांनी कणेरी तीर्थक्षेत्र विकासासाठी किती निधी आणला? असा सवाल खोत यांनी केला.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, मी समाजकारणाचा हेतू ठेऊनच राजकारणात आलो. जनतेची सेवा करण्यासाठी मी कार्यरत आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात मी वेळ घालवत नाही. मतदारसंघाचा विकास हाच माझा उद्देश आहे. आगामी काळात कणेरीमध्ये पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी विविध कामे करणार आहे. 344 कोटी निधीतून गांधीनगर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असून 28 टाक्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. आपण सर्वांनी माझ्या मागे ताकद उभी करुन उर्वरित कामे पूर्ण करण्याची संधी द्यावी.
सुरेश पाटील म्हणाले, पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर आ. ऋतुराज पाटील यांचा विजय निश्चित आहे.
एम.बी. पाटील म्हणाले, पाच वर्ष मतदार संघाकडे ढुंकूनही न पाहणारे विरोधक आता लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देईल.
कोगील खुर्द च्या माजी सरपंच लता संकपाळ म्हणाल्या, आमच्या सुख दुःखात सहभागी होणारा ऋतुराज पाटील यांच्या सारखा आमदार म्हणून पुन्हा हवा आहे.
अर्जुन इंगळे,राहुल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच निशांत पाटील, उपसरपंच सुजाता गुरव, दत्तात्रय पाटील, अशोक चोरडे, वैभव पाटील, माजी जि. प. सदस्य सदाशिव स्वामी, बबन केसरकर, विद्या पाटील, पोपट कदम, सुप्रिया गुरव, रमेश पाटील, बाबासो पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*आजी माजी सैनिक संघटना “ऋतुराज”यांच्या सोबत*
गावातील आजी- माजी सैनिक संघटनेने आ.ऋतुराज पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. संघटनेचे अध्यक्ष कृष्णात कदम, सचिव राजेंद्र पाटील, सदाशिव पाटील, नारायण पाटील, महादेव पाटील, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते