केडीसीसी ही आपल्या मुलाबाळांचे संवर्धन करणारी जननी - मंत्री हसन मुश्रीफ

केडीसीसी ही आपल्या मुलाबाळांचे संवर्धन करणारी जननी - मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. आपणा सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह मुला-बाळांचे संवर्धन करणारी जननी आहे. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण वागा आणि जास्तीत जास्त ठेवी मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्या, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना केले. 

        

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०२३ -२४ सालासाठी कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष  व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. बँकेच्या प्रांगणात मंत्री मुश्रीफ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत झाले व साखरपेड्यांचे वाटप झाले.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, आत्तापर्यंत पावणे अकरा हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केलेला आहे. यावर्षी बँकेचे १३ हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण वागा आणि जास्तीत जास्त ठेवी वाढविण्यासाठी कठोर मेहनत घ्या. क्यू. आर. कोड मोहीमही यशस्वी करा, असेही ते म्हणाले.

याबाबत अधिक माहिती अशी, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून बँकेला हा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड - मुंबई यांच्या वतीने दरवर्षी सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी बँकांना पुरस्कार वितरण केले जाते. पुरस्कार वितरणाचे हे २६ वे वर्ष आहे. सन २०२२-२३ या आर्थिक सालासाठीही बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक हा विशेष पुरस्कार मिळाला होता.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांच्यासह प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.