केवळ एका पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे नाही- अमोल कोल्हे

केवळ एका पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे नाही- अमोल कोल्हे

मुंबई (वृत्तसंस्था) :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. “केवळ एका पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे असा अर्थ होत नाही. राज्यात केवळ दोनच साहेब आहेत”. अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या साहेब या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी (१२ सप्टेंबर) खेड (पुणे) येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की “उमेदवारी कोणाला द्यावी, कोणाला नाही, याबाबत वारंवार कोणत्याही व्यक्तीला विचारावं लागत नाही, कारण आता आपणच साहेब आहोत”. त्यांच्या या वक्तव्यावर अमोल कोल्हे यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “राज्यात फक्त दोनच साहेब आहेत. एक शरद पवार आणि दुसरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आमची पिढी या दोनच नेत्यांना साहेब मानते. केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे असा अर्थ होत नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक आणि एकूणच सामाजिक व्यासंग असावा लागतो. त्यासाठी स्वकर्तृत्वावर मोठं व्हावं लागतं. कोणाच्याही जीवावर मोठं होऊन चालत नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल, संकटाच्या वेळी वादळं छातीवर घेणं असेल, संकट आलं म्हणून भूमिका बदलण्यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल, या सर्व गोष्टी करणं म्हणजे शरद पवार साहेब होणं असा अर्थ होतो. अजित पवार यांना ही गोष्ट माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने सांगायची आवश्यकता नाही”.