कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : इयत्ता दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचना देवून हे अभियान प्रभावीपणे राबवणाऱ्या केंद्रांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
इयत्ता दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे, उप शिक्षणाधिकारी अजय पाटील, सरनाईक तसेच शिक्षण विभागाशी संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांकडून या विषयाचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत कॉपीचा गैरप्रकार होताना आढळल्यास संबंधितांवर व दोषी कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करा. तसेच या परीक्षेत कॉपी किंवा तत्सम गैरप्रकार करणाऱ्यांवर राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करा. तसेच असा गैरप्रकार आढळणारी परीक्षा केंद्रे रद्द करण्याबाबतची कार्यवाही करा.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार घडू नये, यासाठी भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करा. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे, जीओ टॅगिंग लोकेशन, केंद्रांच्या इमारती, केंद्रांमध्ये असणाऱ्या खोल्या (परीक्षा हॉल), मागील परीक्षांविषयक माहिती आदी वर आधारित माहिती पुस्तिका तयार करुन ही माहिती पुस्तिका परीक्षा केंद्रांना भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना द्या. सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या भौतिक सुविधा दिल्या जातील याची दक्षता घ्या. संवेदनशील व अति संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अधिक लक्ष ठेवा. तसेच अशा केंद्रांना भरारी पथकांनी भेट द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, परीक्षा केंद्रांवर शिक्षक, केंद्र प्रमुख, पालक, विद्यार्थ्यांसाठीच्या व मोबाईल वापरास बंदी बाबत मार्गदर्शक सूचना तयार करा. प्रत्येक प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वेळेत दिली जाईल व उत्तरपत्रिका वेळेत घेतल्या जातील, याची खबरदारी घ्या. दोन्ही परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पडतील, याची दक्षता घ्या. दहावी व बारावी केंद्रांची माहिती तहसीलदार व अन्य यंत्रणेमार्फत पोहोचवा. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका दक्षता समिती तयार करा. बाह्यपथकामार्फत केंद्रांची तपासणी करा. प्रत्येक केंद्रावर एक पथके नियुक्त करा. बैठे पथक परीक्षेपूर्वी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहील व पेपर संपल्यानंतर अर्धा तास अगोदर राहील.
दहा किलोमीटर परिसरामध्ये एक भरारी पथक नियुक्त करा. पाचशे मीटर परिसरात जमावबंदी करा. परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स मशीनचा वीज पुरवठा खंडित राहील, याची दक्षता घ्या. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून सूचना देण्यात येणार असून कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी प्रत्येक संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले.
वेब कास्टींग साठी तयार होणाऱ्या परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.