"कोल्हापुरात नेमबाज स्वप्निल कुसाळेचं जल्लोषात स्वागत"
कोल्हापूर (प्रतिनिधि) : पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्निल कुसाळे याचं आज कावळा नाका इथं आगमन झालं. यावेळी खा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील , आ. राजेश पाटील,आ.जयंत आसगांवकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापुरातील क्रीडा प्रेमी आणि जिल्हा प्रशासनानं स्वप्नीलचं ढोल – ताशांच्या गजरात भव्य स्वागत केलं. करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला स्वप्निलनं पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. स्वप्निलच्या स्वागतासाठी कावळा नाका इथं क्रीडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेनं 50 मीटर रायफल शुटींग स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. स्वप्निलनं देशाला कांस्य पदक मिळवून देत महाराष्ट्राचा ही 72 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. स्वप्निलनं ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या या यशाचं कौतुक करण्यासाठी कोल्हापूरची क्रीडा नगरी सज्ज होती. नेमबाज स्वप्निल कावळा नाका चौकात दाखल होताच त्याचं खा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. राजेश पाटील,आ. जयंत आसगांवकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वागत केलं. तसंच ढोल - ताशांच्या गजरात कोल्हापूरच्या क्रीडा प्रेमींनी आणि जिल्हा प्रशासनानं स्वप्निलवर पुष्पवृष्टी केली. याचबरोबर हेलिकॉप्टर मधूनही पुष्पवृष्टी केली. यावेळी क्रीडा प्रेमींनी स्वप्निलच्या विजयाच्या दिलेल्या घोषणांनी कावळा नाका परिसर दुमदुमून गेला. स्वप्निलनं करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. त्यानंतर स्वप्निल, त्याचे आई - वडील आणि प्रशिक्षकांनी क्रिडा प्रेमींकडून शुभेच्छा स्विकारल्या. त्यानंतर स्वप्निलची उघडया जीप मधून ढोल - ताशांचा गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत वालावालकर हायस्कूल, मुक्त सैनिक वसाहत येथील 200 शालेय मुलींच्या झांज-पथकानं मिरणुकीची शोभा वाढवली. स्वागतासाठी दुतर्फा उभे असलेल्या शालेय मुलांच्या हाती ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक उंचावत असलेल्या स्वप्निलचे फलक झळकत होते. कावळा नाक ते दसरा चौक मार्गावर आ. ऋतुराज पाटील यांनी लावलेल्या स्वप्निलच्या अभिनंदन डिजिटल फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
महाराणी ताराराणी पुतळा, मध्यवर्ती बस स्थानक, व्हिनस कॉर्नर या मार्गावर दुतर्फा स्वागतासाठी आलेल्या शालेय मुलांनी स्वप्निलवर पुष्पवृष्टी केली. या स्वागत रॅलीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा अडसूळ यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शिस्तबद्धपणे निघालेल्या स्वप्निलच्या या मिरवणुकीची दसरा चौक या ठिकाणी सांगता झाली.