कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना : मंत्री ॲड.आशिष शेलार
![कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना : मंत्री ॲड.आशिष शेलार](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67ab08dee5f0b.jpg)
मुंबई : कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स अशा विविध स्मृतींचे जतन करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर चित्रनगरी येथे नवीन वस्तुसंग्रहालयात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचा ठेवा जपला जाणार असून, जुन्या तसेच नव्या पिढीला चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली परंपरेची माहिती मिळेल असे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, सांस्कृतिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने चित्रफिती तयार करून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित कराव्या.
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे काम सुरळीत चालविले जावे, यासाठी यंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामे सुरू असल्याने या विकासकामांकरिता चित्रपट क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या वास्तुविशारद यांची बाह्य स्रोतांद्वारे नियुक्ती करावी. ही पदे भरताना ‘एम एस आय डी सी’ ची मदत घेण्याची सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी केली.