पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ ; आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पोलिसांचा हस्तक्षेप

पुणे - पुण्याच्या कोथरूड परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी एका सोशल मीडियावरील पोस्टवरून गोंधळ घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून हे आंदोलन झाले. कोथरूड येथील केदार सोमण यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याविरोधात पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते सोमण यांच्या राहत्या घरी पोहोचले. त्यावेळी दरवाजा बंद असल्याने त्यांनी पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सोमण यांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांना पोलिसांच्या गाडीत नेले जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि पोलिसांच्या वाहनावर धाव घेतली.
सोमण यांनी फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणारी होती. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून संभाव्य वाद टाळला.