कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरीच्या भाषेला मतातून उत्तर देईल : आ.सतेज पाटील

कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरीच्या भाषेला मतातून उत्तर देईल :  आ.सतेज पाटील

कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांची पार्श्वभूमी ही गुंडगिरीचीच आहे.  त्यांनी डॉक्टर, बिल्डर यांच्याकडून हप्ते वसुलीसाठी केलेली मारहाण कोल्हापूरची जनता अद्याप विसरलेली नाही. शेजाऱ्यांना सुद्धा त्यांनी  मारहाण, दडपशाही केली. पण  त्या कुटुंबाने त्यांना चोख उत्तर दिले. काल मतदानाच्या दिवशी सुद्धा क्षीरसागर यांनी  टाकाळा येथे दादागिरी करण्याचा प्रयत्न केला .पण बॉडीगार्डला सोबत घेऊन पैसे वाटणाऱ्या क्षीरसागरांना कार्यकर्त्यांनी त्याच भाषेत उत्तर देऊन तिथून पळवून लावले ,अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ,कसबा बावडा येथे  एका निष्ठावंत शिवसैनिकाची क्षीरसागर यांच्या समोरच गळपट्टी धरून धक्काबुकी करण्याचा प्रयत्न त्यांच्या शहरप्रमुखाने केला. त्यामुळे संतप्त झालेल्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि बावड्यातील तरुणांनी क्षीरसागर आणि त्यांच्या कंपूला जाब विचारला. पण मी संयम ठेवून सामंजस्याने परिस्थिती हाताळून या संतप्त तरुणांना विनंती करून समजावून सांगितले. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये ,याची काळजी घेतली. 

कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेल्या क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्याने असे प्रकार करणे कितपत योग्य आहे ?लोकांचा कल आपल्या विरोधात असल्याचे लक्षात आल्याने क्षीरसागर यांनी दिवसभर हे सर्व प्रयत्न केले.तसेच लोकांनी आपल्या अंगावर यावे आणि त्यातून आपल्याला सहानुभूती मिळावी, असा यामागे त्यांचा हेतू होता का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. बावड्यात येऊन त्यांनी राहुल माळी या निष्ठावंत शिवसैनिकाला दादागिरी केली .त्यामुळेच मी या निष्ठावंत शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला.आणि यापुढेही सुद्धा राहणार असल्याचं पाटील यांनी पत्रकात म्हटलं आहे.