क्षयरुग्णांसाठी कलेतून समाजसेवेचा अनोखा उपक्रम - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर यांच्या सहकार्याने ‘निक्षय गीत मैफिली’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ झाला. या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीतून क्षयरुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोषण आहार किट प्रदान करण्यात येणार आहे. देशातील असा हा पहिलाच सांगीतिक सामाजिक उपक्रम असून कलेतून समाजसेवेचा अनोखा उपक्रम असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून विकास प्रतिज्ञा स्टुडिओ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर येथे शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, सर्वांनी ‘निक्षय गीत मैफिली’चा आस्वाद घेऊन या सामाजिक कार्याला हातभार लावावा.
प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी यांनी प्रस्ताविकात सांगितले, “कोल्हापूर ग्रामीण भागात सध्या १,०५७ क्षयरुग्णांना पोषण आहार किटची गरज आहे. दरमहा सुमारे २२५ नवीन क्षयरुग्ण उपचारासाठी येतात. त्यांनाही पोषण आहाराची आवश्यकता आहे.” सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीतून जाणीव फाउंडेशनमार्फत पोषण आहार किट तयार करून रुग्णांना वितरित केले जाणार आहेत. हा उपक्रम वर्षभर (२१ जून २०२५ ते २० जून २०२६) सुरू राहणार आहे.
जाणीव फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा बटकडली म्हणाल्या, “आमची संस्था एचआयव्ही रुग्णांसाठी काम करते. एचआयव्ही रुग्णांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते. ‘निक्षय गीत मैफिली’तून जमा होणारा निधी केवळ पोषण आहार किट खरेदीसाठीच वापरला जाईल.” या उपक्रमासाठी निधी जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमातून टीबी आणि एचआयव्ही समन्वयाचे दर्शन घडते, असे सांगितले. त्यांनी सहा महिन्यांसाठी दोन रुग्णांना दत्तक घेतले. पहिल्या दिवशीच्या निधीतून दोन रुग्णांना पोषण आहार किट प्रदान करण्यात आले.
प्रशांत जोशी यांनी ‘हरवले आहे आभाळ ज्यांचे, होतो याचांचा सोबती’ या गीताने फेसबुक लाइव्हद्वारे उपक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कांदळे यांनी केले, तर आभार जोशी यांनी मानले.
यावेळी श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चौगुले, स्नेह संगीत प्रतिपदाचे अभय देशपांडे, सूर्यकांत पाटील, नरहर कुलकर्णी, अमरसिंग रजपूत, मिलिंद नाईक, अजित माने, नीलांबरी जाधव, अभिजीत पाटील आणि जिल्हा क्षयरोग केंद्राचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.