सुनील राऊत विधानसभा तालिका अध्यक्ष , राहुल नार्वेकर यांची घोषणा

मुंबई : पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील राऊत यांना तालिका अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहे. सुनील राऊत ठाकरे गटाची मुलूखमैदानी तोफ आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत. राज्यात झालेल्या पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाला तालिका अध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
सरदेसाई फडणवीसांच्या भेटीला
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या अंगणातील अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई हेसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. मतदारसंघातील विकासकामांसाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दोघेही ठाकरे कुटुंबाच्या जवळचे
सरदेसाई असो किंवा राऊत, दोघेही ठाकरे कुटुंबाच्या जवळचे आहेत. सरदेसाई हे ठाकरेंचे नातेवाईकच, तर राऊत हे निकटवर्तीय. त्याचप्रमाणे गेल्या वेळी प्रमाणे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांना चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे या तिन्ही कृत्यांमधून भाजप आणि ठाकरे गटातील दुरावा मिटत असल्याची चर्चा आहे.